दुःखनिवृत्ती
स्वामी रामतीर्थ अमेरिकेत असताना अनेक लोक त्यांच्याकडे चर्चेसाठी येत. आपले प्रश्न, जीवनातील समस्या त्यांना सांगत. एक दिवस एक अमेरिकन महिला त्यांच्याकडे आली. तिच्या डोळ्यांत पाणी होते. कंठ दाटून आला होता. स्वामींनी प्रेमाने तिचे सांत्वन केले व तिला बोलके केले. ती सांगू लागली, “मी एक विधवा आहे.. मला तीन मुलगे होते. तिघांनाही त्या यमाने गिळून टाकले. मी आता या जगात एकटी आहे. असहाय्य आहे. अनाथ आहे. आपण संत आहात-विद्धान आहात, आपणच सांगा, मी काय करू? कसे माझे दुःख दूर करू?” “तुमचा प्रश्न सुटेल, पण त्यासाठी तुम्हाला मन थोडे मोठे करावे लागेल. उद्या या. मी तुमचे समाधान करीन. दुःख दूर करण्याचा उपाय सांगेन." रामतीर्थांनी तिला असे सांगितले. बाई निघून गेल्यानंतर रामतीर्थ एका गरीब निग्रो बाईकडे गेले. तिला दहा मुले होती. घरात खुप गरीबी होते. रामतीर्थ म्हणाले, “मला तुझा एका छोटा मुलगा दे. मी त्याच्या पालनपोषणाची योग्य व्यवस्था करीन.'' त्या बाईने त्यांना तात्काळ मुलगा दिला, दुसऱ्या दिवशी आपल्यास समस्येचे समाधानकारक उत्तर मिळविण्यासाठी अमेरिकन महिला ठरल्याप्रमाणे त्यांच्याकडे आली. रामतीर्थांनी त्या निग्रो छोट्या मुलाला तिच्यासमोर ठेवले व ते म्हणाले, “हे आहे तुझे समाधान. याला दत्तक घे व स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याच्यावर प्रेम कर." "नाही, नाही. तो निग्रो आहे." ती महिला उद्गारली. "म्हणून झाले? तो काय खात-पीत नाही? का बोलत नाही? का प्रेम जाणत नाही? त्यात काय कमी आहे? म्हणूनच मी सांगितले होते, तेव्हा आपण मन मोठे केले, अंतःकरण विशाल केले तर आपले दुःख कायमचे मिटेल. आईच्या डोळ्याने या मुलाकडे बघ. हृदयातून प्रेम वाहू लागेल." रामतीर्थांनी समजावून सांगितले. अमेरिकन महिलेने प्रेमाने त्याला उचलले व त्याला कडेवर घेऊन घरी गेली.Wednesday, 26 May 2021
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment