Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Tuesday 18 May 2021

आरोग्याची समस्या

               आरोग्याची समस्या 



संध्याकाळची वेळ होती. एका स्टेशनवर एक शिक्षक गाडीची वाट बघत होते. लोकलने त्यांना जायचे होते. गाडी एक तास उशिरा येणार असल्याचे सांगण्यात आले. आता तासभर काय करायचे, हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. बरोबर वाचण्यासाठी पुस्तकेही नव्हती. तेवढ्यात एका कोपऱ्यात एक भेळवाला भेळ तयार करताना दिसला. थोडासा 'टाइमपास' व थोडासा भेळेचा मोह म्हणून ते त्याच्याजवळ गेले. त्याने कागदात भेळ बांधून दिली. हे गृहस्थ भेळ खाण्यासाठी तेथेच उभे राहिले. तेवढ्यात समोरून दुसरे एक शिक्षक तिकडे येताना दिसले. त्यांच्यासमोर भेळ कशी खायची, ते काय म्हणतील, असे त्यांना वाटू लागले. हात पाठीशी बांधून हातात पुडा घेऊन अपराधी भावनेने ते भिंतीला टेकून उभे राहिले. ते शिक्षक जवळ येऊन धडकले. आपल्या हातून काही तरी गुन्हा झाला आहे. असा त्यांचा चेहरा पाहून ते आलेले शिक्षक म्हणाले, “हात पुढे घ्या व भेळ खायला लागा. मीही येथे भेळ खायला आलो आहे." ते ऐकताना त्यांचा जीव भांड्यात पडला. दोघांनी गप्पा मारत भेळ संपवली. पहिल्या शिक्षकाच्या मनात प्रश्न होते. “आपण शिक्षक आहोत. सार्वजनिक ठिकाणी उभे राहून भेळ खाणे कितपत योग्य आहे? विद्यार्थ्यांनी आपणास पाहिले तर? उघड्यावरचे खाऊ नका, असे आपण वर्गात सांगतो. आपण उघड्यावरचे खाणे कितपत संयुक्तिक आहे?" दुसऱ्या शिक्षकाचे मत काहीसे निराळे होते, त्यांना असे वाटत होते, "आपण शिक्षक असलो, तरी अखेरीस आपणही माणूस आहोत | माणूस म्हणून आपल्या काही भावना, इच्छा असतात की नाही? नैतिकतेचा मक्ता फक्त शिक्षकांचाच असतो का? अनेक मुला-मुलींना त्यांचे आई-वडीलच भेळ खाण्यास नेतात, त्याचे काय?” हे दोन्हीं दृष्टिकोन ऐकत असताना आपणास दोन्ही बाजूंत सत्यांश दिसून येतो; परंतु, उघड्यावरचे पदार्थ खाण्याचा प्रश्न मूलत: आरोग्याशी संबंधित आहे. आरोग्याबाबतीत शिक्षक आणि शिक्षकेतर असा फरक करता येत नाही. आरोग्याचा संबंध स्वच्छता व शुद्धता या दोन गोष्टींशी आहे. वातावरण स्वच्छ आहे का? भेळीतील पदार्थ शुद्ध आहेत का? स्वच्छतेसाठी सर्वांनीच संघटित प्रयत्न केले पाहिजेत. पदार्थांच्या शुद्धतेसाठी अत्यंत कठोर उपाय योजले पाहिजेत. स्वच्छतेचे व शुद्धतेचे वातावरण निर्माण झाले, तरच आरोग्यासह अनेक प्रश्न निकालात निघतील.

No comments:

Post a Comment