Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Sunday 4 April 2021

संतांचा सांस्कृतिक वारसा

            संतांचा सांस्कृतिक वारसा



 "शिवरायांच्या स्वराज्याची जनमानसीय भूमिका संतांनी तयार केली होती." न्या गो. रानडे.

'संत हा देवभक्त तर असतोच पण खराखुरा समाजशिक्षकही असतो.'

स्वतःच्या आचरणाचा आदर्श समाजापुढे ठेवून लोकांना कल्याणाचा मार्ग दाखवणारा व्यक्तीच संत या संज्ञेस पात्र ठरते. संत चक्रधर, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, मुक्ताबाई, चोखामेळा, रामदास आणि अलीकडच्या काळात गाडगेबाबा तुकडोजी यांनी हे सिद्ध करून दाखवले.

महानुभावपंथाचे संस्थापक श्री चक्रधरस्वामी यांनी सामान्य माणसे जवळ केली.सामान्य परिवार ज्ञानापासून वंचित राहू नये म्हणून मराठीतच ग्रंथलेखन करावे असा अलिखित निबंध घातला, एकदा केशवदेवाला संस्कृतमध्ये लिहिण्याची इच्छा झाली तेव्हा नागदेवाचार्य त्याला म्हणाले, 'नको गा केशवदेवा। एणे माझीये स्वामीचा सामान्य परिवार नागवैल की। त्यांनी जातिभेद निर्मूलन व अस्पृश्यतानिवारणाची शिकवण दिली. 'स्मृतिस्थळा तील 'म्हाइंभटी रिक्षापण या लीळेत अस्पृश्यताबिमोढ व जातिभेदनिर्मूलन ही परंपरेविरुद्घ बंढ करणारी समतेची जी शिकवण दिली तिचा आविष्कार आहे.

श्री ज्ञानेश्वरांनी गीतेचा भावार्थ मराठीत आणून लोकभाषेला ज्ञानभाषा बनविण्याचे महत्कार्य केले. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नसावा है धर्मरूढीचे पारंपरिक मत धुडकावून लावले. स्वतः संसार केला नसला तरी अवघाचि संसार सुखाचा करीन। आनंदे भरीन तिन्ही लोक असा विश्वसंसार उभा केला. चिरंतन आनंद प्राप्त करण्यासाठी ऐहिक जीवनातील एकांतिक उत्कर्ष थिटा पडतो म्हणून ऐहिक जीवनाला त्यांनी अध्यात्माची भरभक्कम बैठक दिली.

संत नामदेवांनी भावभक्तीचा वारसा दिला. ज्ञान, यज्ञयाग ह्या गोष्टी सामान्य माणसाला पेलत नसतात. कर्मकांडात गुंतणारा माणूस खऱ्या धर्माला व देवाला विसरून जातो. म्हणून त्यांनी जनतेला साधा सोपा भक्तिमार्ग दाखवला, भक्ती ही भक्ताला देव बनवते, याचा प्रत्यय दिला. धर्म धर्माच्या बुडाशी एकच भक्तितत्त्व आहे. हे त्यांचे अभंग शीख धर्माच्या 'ग्रंथसाहेबा त समाविष्ट झाले, यातून दाखवून दिले. भक्तिप्रणीत भागवत धर्माचा पाया घातला.

संत जनाबाई ही नामदेवाची दासी, आपण संतामुळे सुसंस्कृत बनलो असे सांगते आणि नामदेवाची दासी म्हणून घेण्यास अभिमान बाळगते. संतांनी स्त्रीदास्यमुक्तीच्या चळवळीची गरज भासू दिली नाही, त्यांच्या आचरणात व शिकवणीत स्त्री स्वातंत्र्य होतेच.

संत एकनाथांनी एक आगळावेगळाच वारसा दिला आहे. महाराचे पोर कडेखांद्यावर खेळवून त्यांनी अस्पृश्यतेच्या रूढीला सणसणीत चपराक मारली. तहानलेल्या गाढवाला पाणी पाजून सर्व प्राणिमात्रांचा आत्मा एक आहे हे सोदाहरण सिद्ध केले. जो इतरांचे दुःख जाणतो, तोच खरा संत याची प्रचिती आणून दिली.

संत तुकारामांनी ऐसे कैसे जाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू या शब्दात बुवाबाजीचा निषेध केला. 'भाव तेथे देव असे सांगून जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा हे धर्माचे व मानवतेचे रहस्य उलगडून दाखवले. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या शिकवणीतून वृक्षांवरही प्रेम करायचा संदेश दिला. वेदांचा तो अर्थ आम्हाला ठावें म्हणून सनातनी कर्मठपणावर ताशेरे ओढले व पुरोगामित्वाचा पुरस्कार केला. दया तिचे नाव भूतांचे पालन। आणिक निर्दालन कंटकाचे म्हणून कर्तल्यपालनाची दीक्षा दिली. 'अपुल्या मनासी ठेवियले ग्वाही। मानियले नाही बहुमता।' असे सांगून व्यक्तिस्वातंत्र्याची प्रतिष्ठा सिद्ध केली, स्वातंत्र्य, समता व न्याय या मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना केली. 'मन करारे प्रसन्न। सर्व सिद्धीचे कारण असे सांगून आपला नैतिक स्तर उंचावण्याचे प्रबोधन केले.

या प्राचीन काळातील संतांप्रमाणेच आधुनिक काळातील संतांनीही आपल्याला श्रेष्ठ सांस्कृतिक वारसा दिला आहे. संत गाडगेबाबांनी मूर्तिपूजा, तीर्थयात्रा, बकऱ्या कोंबड्या कापणे, दारू पिणे, शिक्षण न घेणे इत्यादी सर्व गोष्टींचा निषेध नोंदवला आहे. त्यांनी घर्मशाळा काढल्या, विहिरी बांधल्या राहणी साधी ठेवली, हातात झाडू घेऊन स्वच्छतेची मोहीम राबवली संत तुकडोजींनीही कालानुरूप नीतिशिक्षण दिले. सामुदायिक प्रार्थनेद्वारे सर्वधर्मसमभाव प्रस्थापित केला. 'द्रामगीतें तून जनतेला कर्तव्यसन्मुख केले. परकीय दास्याचे. पाश ठरडून फेकण्यासाठी आपल्या भजनातून वीरगीते गायिली.

काही टीकाकार म्हणतात की संतांनी लोकांना नेभळट व निष्क्रिय बनवले ईश्वरभक्तीचा पळपुटा मार्ग दाखवून लोकांची दिशाभूल केली दया-क्षमा शांतीचा उपदेश क लोकांची प्रतिकारवृत्ती नामशेष केली त्यांनी समाजाला दैववाद शिकवला पण वास्तविक या टीकाकारांना संतांचे संदर्भच कळले नाही. संदर्भ चुकला म्हणून त्यांचे स्पष्टीकरणही चुकले 'बुडता हे जन, न देखवे डोळा' यात विषमतेची चीड आहे. भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथा देऊ काठी' यात शौर्याला आवाहन आहे. 'प्रपंच करावा नेटका। दिसू नये फाटका यात कर्तव्यनिष्ठेचे प्रतिपादन आहे.

सारांश, श्रीचक्रधरप्रणीत मराठी भाषेबद्दल अस्मिता, श्री ज्ञानेश्वरप्रणीत ज्ञान व भक्ती यांचा समन्वय, संत नामदेवप्रणीत सर्व धर्मांचे अधिष्ठान असलेला भक्तिमार्ग, जनावाईप्रपी स्त्रीस्वातंत्र्य, संत एकनाथप्रणीत अस्पृश्यतानिर्मूलन आणि सर्व प्राणिमात्रांवर भूतदया संत तुकारामप्रणौत बुवाबाजीचा निषेध आणि व्यक्तिस्वातंत्र्याची प्रतिष्ठा, संत रामदासप्रणीत कर्तव्यपालन, संत गाडगेबाबाप्रणीत मूर्तिपूजा निषेध व मानवाच्या हृदयातच देव वास करतो ही निष्ठा, संत तुकडोजीप्रणीत सर्वधर्मसमभाव आणि श्रमप्रतिष्ठा असा अभूतपूर्व सांस्कृतिक वारसा आम्हाला लाभलेला आहे.

हा वारसा तात्कालिक नसून चिरंतन आहे. जे खळांची व्यंकटी सांडो। तयां सत्कर्मी रती वाडो।।, दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्म सूर्य पाहो।।, जो जे वांछिल तो ते लाहो। प्राणिजात। या श्रीज्ञानेश्वरांच्या पसायदानात आम्हाला लाभलेला संतांचा सांस्कृतिक वारसा वीजरूपाने आविष्कृत होतो.

No comments:

Post a Comment