जीवन-नौका
नावेत बसून काही प्रवासी नदी पार करीत होते. दुर्दैवाने नावेला भोक पडले. पाणी आत यायला लागले. नाव बुडायला नको म्हणून प्रवाशांनी विचार केला की काहीतरी करायला पाहिजे. परंतु त्या नावेवरचे सर्वच प्रवासी मूर्ख व अज्ञानी होते. त्या नावेतील पाणी बाहेर जावे म्हणून त्यांनी जेथे भोक होते. त्याच्यासमोर नावेला आणखी एक छिद्र पाडले. त्यातून त्यांना पाणी बाहेर जाताना दिसले. म्हणून त्या मूर्ख मंडळींनी जितकी छिद्रे अधिक तितके आतील पाणी लवकर बाहेर पडेल म्हणून एका पाठोपाठ एक छिद्र पाडण्यास सुरुवात केली. परिणाम सांगायला नकोच ! नाव बुडून सर्वांना जलसमाधी मिळाली. संसार एक नदी आहे. आम्ही सारे प्रवासी आहोत, तर आमचे जीवन म्हणजे एक नौका आहे. दुराचरणरूपी छिद्रातून पापाचे पाणी आत येते; परंतु छिद्र बुजवण्याऐवजी आम्ही दुसरे दुराचरण करतो, एक पाप झाकण्यासाठी दुसरे पाप करतो. जीवनाला दुराचरणाची छिद्रे भराभर पाडत जातो. आमची वृत्ती त्या मूर्ख प्रवाशांसारखीच असते. त्यामुळे पापांची व दुःखभोगाची परंपरा अविरत चालू राहते. ती कधी थांबतच नाही. त्यामुळे जीवननौका गटांगळ्या खात खात रसातळाला जाते. कुकर्माची छिद्रे सत्कर्मे करून बंद केली पाहिजेत, अन्यथा विनाश अटळ आहे.
No comments:
Post a Comment