नम्र वृत्ती
चाचा हुसेन आलिशान घरात राहात. ते खूप श्रीमंत होते. त्यांच्या सर्व खोल्यांमध्ये मौल्यवान असे गालिचे पसरलेले होते. नोकरावर, गुलामांवर त्यांचा खूप वचक असे. त्यांना पाहताच नोकरचाकर थरथरा कापत. एक दिवस त्यांचा एक गुलाम टेबलावर जेवणाची पाने मांडत होता. प्लेटस् मांडत असताना त्याचा पाय मऊ मऊ अशा गालिचावरून घसरला व हातातील अतिशय सुंदर व नाजूक प्लेट खाली पडली. तिचा चक्काचूर झाला. तो खूप भयभीत झाला. आपल्याला आत काय शिक्षा मिळते, याची काळजी त्याला लागली. मालक काही ओरडायच्या किंवा दंड करायच्या आतच त्याने मालकाचे पाय धरले. व डोके टेकवीत तो विनम्र भावाने म्हणाला, "मालक, जो दुसऱ्यावर रागावत नाही तो महान असतो." हुसेन गुलामाच्या चेहऱ्याकडे पाहात म्हणाले, "मी तुझ्यावर रागावलेलो नाही.” त्यावर गुलाम म्हणाला, “ज्यांना राग येत नाही ते खरोखर महात्म्ये असतात." हुसेन म्हणाला, “तुझे म्हणणे बरोबर आहे." त्यावर गुलाम म्हणाला, "जे दुसऱ्याला क्षमा करतात ते देवदूत असतात." हुसेनवर गुलामाच्या शब्दांचा, नम्र वृत्तीचा इतका प्रभाव पडला की, त्याने गुलामाला नुसते माफच केले नाही तर त्याला स्वातंत्र्य बहाल केले. हुसेनच्या स्वभावात, वागण्यात गुलामाच्या त्या शब्दांनी मोठे परिवर्तन घडवून आणले.
No comments:
Post a Comment