देशप्रेम
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या आझाद हिंदू सेनेत भरती होण्यासाठी तरुणांना आवाहन केले. आवाहनाला खुप चांगलाच प्रतिसाद मिळाला. आझाद हिंद सेनेत सामील होण्यासाठी तरुणांमध्ये एक स्पर्धाच निर्माण झाली होती. एका कुटुंबातील दोन भाऊ फौजेत दाखल होण्यासाठी हटून बसले. मोठा भाऊ म्हणाला, “आपण घरात दोघेच आहोत, मी सैन्यात जातो, तू आईचा सांभाळ कर.' छोटा भाऊ म्हणाला, “दादा, हे चालणार नाही. मी असताना तू युद्धात भाग घेणे अजिबात बरोबर नाही. वडिलांच्या पश्चात घराकडे बघणे ही मोठ्याची जबाबदारी असते. मला लष्करात भरती होऊ दे." देशप्रेमाची लाट दोघांच्या मनात ओसंडत होती; परंतु आईच्या सेवेसाठी कोणीतरी घरात पाहिजे, हा मुख्य मुद्दा होता. त्या दोघांचे देशप्रेम पाहून आईला राहवले नाही. ती म्हणाली, “तुम्ही दोघेही नेताजींच्या हाकेप्रमाणे वागा. जर तुमच्यातला एक सैन्यात गेला व दुसरा येथेच राहिला तर मी समजेन, मला एकच मुलगा होता. दोन्ही मुले म्हणाली, “माते! तू धन्य आहेस. तुझ्यासारखी माता असल्यावर आपल्या सर्वांची भारतमाता पारतंत्र्यात राहणारच नाही."
No comments:
Post a Comment