Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Monday 8 March 2021

भ्रष्टाचाराचा भस्मासूर

               भ्रष्टाचाराचा भस्मासूर 





माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो,

 "कसे साचले शेवाळ इथल्या निर्मळ पाण्यावरी ? प्रत्येकाचाच डोळा आहे, छनछनणाऱ्या नाण्यावरी. ' 

माणसाच्या हृदयात धुमसणाऱ्या स्वार्थाच्या इवल्याशा ज्योतीने पेट घेतला. की त्यातूनच जन्माला येतो भ्रष्टाचारासारखा भयानक वणवा, की जो आज भस्मासूरासारखा साऱ्या देशभर पसरतो आहे. यामध्ये होरपळला जातोय सामान्य माणूस. भ्रष्टाचार करणारे मात्र आपल्या तुंबड्या भरून घेत आहेत. गरीब-श्रीमंत ही दरी अधिकच रुंदावत आहे. त्यागाची संस्कृती असणाऱ्या भारतभूमीवर भ्रष्टाचारातून भोगाची विकृती वाढते आहे. भ्रष्टाचाराच्या बातम्या दिवसेंदिवस दैनिकातील जागा व्यापत आहेत. सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी बलिदान करणाऱ्या जवानांच्या शवपेट्यांमध्येही भ्रष्टाचार होतो आहे. भूकंपामध्ये मेलेल्या माणसांच्या टाळूवरील लोणी खाणारी गिधाडवृत्तीची माणसं देशात निर्माण होत आहेत. 

शिक्षणक्षेत्रातही ज्ञानाऐवजी नाण्यांचाच बाजार भरला आहे. राजकारणी मंडळी भ्रष्टाचाराला खतपाणी घालून हा महाकाय वृक्ष अधिकच बळकट करीत आहेत. काही अपवाद सोडले तर प्रशासकीय अधिकारीही या रांगेत हात धुवून घेत आहेत. असे कोणतेही क्षेत्र शिल्लक नाही की, जिथे भ्रष्टाचाराचा स्पर्श झालेला नाही. 

या परिस्थितीला कोणी एक घटक जबाबदार नसून समाजातील अनेक घटक कारणीभूत आहेत. लाच घेणाऱ्याचे हात जराही थरथरत नाहीत आणि देणाच्यांचे मनसुद्धा कचरत नाही. पैशाचे मूल्य कमी झाल्याने सामान्य माणूसही किरकोळ कामांसाठी लाच द्यायला मागे पुढे पाहात नाही. त्यातूनच समाजातील नीतिमूल्यांची पायमल्ली होत आहे. 

भ्रष्टाचार संपविण्याविषयी विचार केला तर आभाळ फाटल्यावर टाका कुठे आणि कसा घालणार? असा प्रश्न मनात निर्माण होतो. तरीसुद्धा अण्णा हजारेसारखी महान माणसं भ्रष्टाचार थांबविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यातूनच निराश मनाला आशेची पालवी फुटते. एक अण्णा हजारे भ्रष्टाचाराविरुद्ध उभे राहिले, पण ज्यावेळी आजच्या तरुण पिढीतून हजारो अण्णा निर्माण होतील तेव्हा हा भ्रष्टाचार थांबायला निश्चितच मदत होईल. त्यासाठी माणसांची वृत्ती बदलली पाहिजे. माहितीच्या आधिकारांचा नागरिकांनी आवश्यक तेथे वापर केला पाहिजे. प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनामध्ये पापाची भीती आणि पुण्याची अभिलाषा निर्माण झाली पाहिजे. 

इतर लोक काय करतात? यापेक्षा मला काय करता येईल असा विचार करून स्वत:पासूनच परिवर्तनाला सुरुवात करू या! जय हिंद!

No comments:

Post a Comment