Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Monday 30 May 2022

मार्क झुकेरबर्ग

 

मार्क झुकेरबर्ग 


मार्क झुकेरबर्ग हा जगातील सर्वात प्रसिद्ध सीईओं पैकी एक आहे. तो आधीच्या ‘फेसबुक’ व सध्याच्या ‘मेटा प्लॅटफॉर्मस’ या कंपनीचा संस्थापक आहे. सर्वात कमी वयात त्याने खूपच कौतुकास्पद कामगिरी केली. आज १४ मे. मार्क आज वयाच्या ३८ व्या वर्षात पदार्पण करतो आहे. तर त्याच्या वाढदिवसाच्या निमिताने त्याच्याबद्दलच्या काही फारशा प्रकाशात न आलेल्या गोष्टी आपण जाणून घेऊयात.

तो शालेय जीवनापासूनच होता संशोधक

मार्क केवळ १२ वर्षांचा असताना त्याने ‘झकनेट’ नावाचा झटपट मेसेजिंग प्रोग्रॅम बनवला होता. याचा उपयोग त्यांच्या दंतचिकित्सक असणाऱ्या वडिलांना व्हावा यासाठी बनवण्यात आला होता. या प्रोग्रॅमद्वारे रुग्ण त्याच्या वडिलांकडे त्यांच्या येणाच्या वेळा नोंदवायचे. म्हणजे यावरून लक्षात येतं की या बाळाचे पाय पाळण्यातच दिसले होते.

त्याने अप्रत्यक्षपणे मायक्रोसॉफ्ट साठी काम केले होते

जेव्हा तो माध्यमिक शिक्षण घेत होता, तेव्हा त्याने काही सहकाऱ्यांसोबत ‘सिनॅप्स मीडिया प्लेअर’ नावाचं अ‍ॅप तयार केलं होतं. आपल्याला आठवत असेल तर विंडोजच्या सुरुवातीच्या आवृत्यांमध्ये हे अ‍ॅप आपल्या कॉम्पुटरमध्ये ही असेल. तर याची खासियत म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे यात गाण्याची यादी बनत असे. सध्याच्या मोबाईलच्या जमान्यात आपण स्पॉटीफाय किंवा ‘जिओ सावन’ ऐकत असू पण नवीन नवीन कॉम्प्युटर भारतीयांच्या घराघरात आला होता तेव्हा हे सिनॅप्सच सदाबहार आनंद देत होतं.

मायक्रोसॉफ्टने त्याला व त्याच्या सहकाऱ्यांना आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला पण मार्क आणि त्याच्या टीमने मायक्रोसॉफ्टचा प्रस्ताव नाकारला आणि त्यांनी महाविद्यालयात पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला.

फेसबुकच्या लोगोची रंगसंगती म्हणूनच अशी आहे

आपण फेसबुकचा लोगो पाहिल्यानंतर त्यात केवळ भडक निळा आणि सफेद असे दोनच रंग आहेत. याचे कारण मार्कला रंगांधळेपणा आहे. त्याला लाल आणि हिरवा या रंगांसंबंधी अडचण आहे.

तो बहुभाषिक आहे

त्याला प्राचीन भाषा शिकण्यात अधिक रस आहे. तो लॅटिन आणि मँडॅरीन म्हणजेच प्राचीन चायनीज या भाषाही उत्तम प्रकारे बोलू शकतो.

त्याची आणि प्रीसिलाची पहिली भेट

मार्कची त्याच्या पत्नी प्रीसिलाशी झालेली पहिली भेट आठवणीत ठेवण्यासारखी आहेच पण थोडी विचित्रही आहे. ते दोघेही हॉर्वर्डमध्ये एका पार्टीसाठी आलेले होते आणि त्या पार्टीदरम्यान एका स्वच्छतागृहाबाहेर या दोघांची पहिली भेट झाली.

तो फिटनेस फ्रिक आहे

मार्क आपल्या तब्येतीच्या बाबतीत खूपच जागरूक आहे. तो रोज सकाळी उठून धावतो. २०१६ मध्ये त्याने वर्षभरात ३६० – ३७० मैल अंतर धावून पार करण्याचे ध्येय ठेवले होते. पण हे ध्येय त्याने अर्ध्या वर्षातच पूर्ण केले.

त्याचा प्रसिद्ध पेहराव

आपण कायमच मार्कला राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि हुडी जकेट, निळी जीन्स आणि नाईकेचे स्नीकर्स प्रकारचे बूट याच पेहरावात बघतो. तो कायम हेच परिधान करतो. याबद्दल त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की तो जी सेवा लोकांना पुरवतो त्याच्या बाबतीत आवड निवड करण्यासाठी वेळ देणं त्याला आवडतं. बाकी कोणत्याही गोष्टीसाठी फारसे नाही म्हणूनच त्याने अशा गोष्टी समोर ठेवल्या आहेत जिथे त्याला निवडीसाठी फार वेळ लागणार नाही. तरीही त्याचा हा पेहराव एका इटालियन डिझायनरने डिझाईन केला आहे आणि त्याच्या शर्टची किंमत साधारण तीनशे ते चारशे डॉलर्स आहे.

त्याचा कुत्राही खूप प्रसिद्ध आहे

मार्कचा हंगेरियन प्रजातीचा एक कुत्रा आहे. त्याचं नाव ‘बीस्ट’ आहे. तोही सिलेब्रीटी आहे. त्याचंही फेसबुकवर एक फॅनपेज आहे. या पेजला २० लाखाहूनही अधिक लोकांनी लाईक केलं आहे. मार्कच्या मुलीलाही तो खूप आवडतो. मार्कने एकदा पोस्ट केलं होतं की त्याची कन्या मक्स हिने उच्चारलेला पहिला शब्द ‘डॉग’ होता.

केवळ डझनभर लोक त्याचे पेज चालवतात

मार्ककडे १२ लोकांची टीम आहे. जी त्याच्या महत्वाच्या पोस्ट्स करणे, त्याचे फोटो अपलोड करणे, त्याच्या पोस्ट्सवर येणाऱ्या कॉमेंट्स पाहणे, त्याला उत्तर देणे या पद्धतीने त्याच्या पेजचं व्यवस्थापन करत असतात.

त्याने फेसबुक विकण्याच्या अनेक ऑफर्स नाकारल्या

गुगल, न्युजकॉर्प, वायकॉम, याहू, मायक्रोसॉफ्ट या अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठमोठ्या कंपन्यांनी फेसबुक खरेदीमध्ये रस दाखवला होता. त्यांनी वेळोवेळी मार्कला तशा ऑफर्सही दिल्या होत्या पण मार्कने या सगळ्यांचे प्रस्ताव कायम नाकारलेच.

तर असा तरुण उद्योजकांपैकी एक असणारा आणि व्यवसाय करू पाहणाऱ्यांसाठी आदर्श असणारा. त्याने आपल्या सर्वांसाठी फेसबुक सारख्या व्यासपीठाची सोय करून दिली त्याबद्दल त्याचे आभार मानलेच पाहिजेत आणि त्याला शुभेच्छाही दिल्या पाहिजेत. मार्क झुकेरबर्ग यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा !.!.!

No comments:

Post a Comment