मैलाचा दगड
एक तरुण आपल्या बायकोच्या हट्टापायी वृद्ध वडिलांना वृद्धाश्रमात पोहोचविण्यास निघाला होता. वृद्धाश्रम घरापासून दूर होता. दोघेजण पायीच निघाले. वाटेत एक मैलाचा दगड लागला. तो पाहून वडील मुलाला म्हणाले, "थोडा वेळ येथे विश्रांती घेऊ, मग पुढे जाऊ या. दगडावर बसल्यावर वृद्ध वडिलांच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी येऊ लागले. ते पाहून मुलगाही थोडा दुःखी झाला. त्याने बाबांना विचारले, “काय झाले? एवढा वेळ आपण काहीही दुःख प्रकट केले नाही. येथे बसल्यावर आपणास एकदम इतके दुःख अनावर का झाले?" थोडा भावनावेग कमी झाल्यावर वडील सांगू लागले, "माझ्याही जीवनात तुझ्यासारखीच परिस्थिती आली होती. बायकोच्या आग्रहावरून मी पण माझ्या वडिलांना घेऊन याच वृद्धाश्रमात चाललो होतो. वडील याच दगडावर तेव्हा बसले व रडू लागले. त्याचे मला आज स्मरण होत आहे. इतिहासाची पुनरावृत्ती झाली." वडिलांचे ते बोलणे ऐकताच मुलाने त्यांना खांद्यावर बसविले व आलेल्या दिशेने म्हणजे घराकडे तो परतू लागला. आपल्या मुलांच्यावरही विपरीत संस्कार झाले तर आपल्याला ती अशाच प्रकारे वृद्धाश्रमात पोहोचवतील, याची त्याला जाणीव झाली. नवी जीवनदृष्टी प्राप्त होऊन तो घरी आला आणि वडिलाची सर्वतोपरी काळजी घेऊ लागला.
No comments:
Post a Comment