Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Monday, 14 June 2021

संस्कारमोती- 15 जून

              दैनिक परिपाठ




सुविचार 

'सुख हे सुखदायी वस्तूंच्या संग्रहात, धन, सत्ता, प्रतिष्ठा यांच्या प्राप्तीत नसत. ते असतं शुध्द विचारातून, प्रेमळ मधुर उच्चारातून, मानवांना सुखदायी आपल्या कृतीतून मिळवलेल्या आत्मिक समाधानात.' 

 चिंतन :

समाजाची शोभा ज्ञानी माणसे तर ज्ञानी माणसाचे भूषण क्षमा व त्याग. - ज्या समाजात ज्ञानी माणसांची संख्या जास्त असते समाज विकसित होऊन प्रगतीच्या पथावर जातो. परंतु मनुष्य ज्ञानी असून भूषणावह नाही. त्याच्या जोडीला त्याच्या जवळ क्षमा व त्यागही हवा. ज्या प्रमाणे फळाफुलांनी बहरलेला वृक्ष त्याच्यावर दगड मारण्यान्यालाही करतो व आपल्या जवळच्या सर्व गोष्टीचा दुसऱ्यांसाठी त्याग करतो, तसे ज्ञानी माणसाने असायला हवे. 

श्लोक:

ॐ भूर्भवः स्वः ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियोयोनः प्रचोदयात ॥ 

विश्वाची उत्पती ज्याच्यापासून होते त्याचे आम्ही ध्यान करतो, तोच सच्चिदानंदरूपी आहे. तो अज्ञानाचा नाश करतो. तो आमच्या बुध्दीला प्रेरणा देतो. त्याच्या तेजाचे आम्ही ध्यान करतो. आमची सत्कर्मे सदाचार - सद्भाषण- सद्वर्तनाकडे प्रवृत्त होवोत. 


प्रार्थना-

            खरा तो एकचि धर्म 

खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे ॥ धृ.॥ जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पद दलित तयां जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे ॥१॥ सदा जे आर्त अति विकळ, जयांना गांजनी सकळ तयां जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे ॥२॥ कुणा ना व्यर्थ हिणवावे, कुणा ना व्यर्थ शिणवावे, समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे ॥३॥ प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्वही प्यारी, कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे ॥४॥ असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे ॥५॥ साने गुरुजी


कथाकथन:

विचारधन- माणसाचे जीवन सुखी, यशस्वी, आनंददायी होण्यासाठी संपत्तीची म्हणजे धनाची फार मोठी आवश्यकता असते. ही संपत्तों हे धन अनेक प्रकारचं असतं. ते प्रयत्नपूर्वक मिळवावं लागतं. शरीरसंपदा, अनुभवसंपदा, ज्ञानसंपदा, धनसंपदा (पैसा), आत्मिक संपदा आणि विचारसंपदा, कार्यसंपदा अशी ही संपत्ती जितकी चांगली, अधिक प्रमाणात, मौल्यवान, शुध्द स्वरुपात माणसाजवळ असेल तेवढं त्याचं जीवन अधिक सुखी, यशस्वी होतं. या संपत्तीपैकी विचारधन हे फार महत्वाचं पायाभूत धन आहे. ते कोणतं, कसं आहे. ते कशा प्रकारे मिळवाव, त्याचा उपयोग क करावा हे सांगणारी एका महान विचारसंपन्न महापुरुषाची कथा मी तुम्हाला सांगणार आहे.... हे महापुरुष म्हणजे आपल्या राष्ट्राचे भूतपूर्व राष्ट्रपती कै. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्, ते संस्कृत, इंग्रजीचे महापंडित होते. भारतीय तत्त्वज्ञान आणि इतर तत्वज्ञानांचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. भारतीय तत्वज्ञान, वैदिक वाङ्मय हे अतिशय तेजस्वी, मौल्यवान विचारांचा अपूर्व खजिना (भाडार) आहे. ते डॉ. राधाकृष्णांनी नीट अभ्यासलं, त्यावर तौलनिक विचार करून त्याचे महत्व जाणून घेतलं. ते विचार प्रत्यक्ष आचरणात आणले. मग त्यांना भारतीयच नव्हे तर सर्व जगातील प्रमुख विद्यापीठात ते विचार समजावून देण्यासाठी आमंत्रणं आली. त्यांनी भारतीय संस्कृती व तत्त्वज्ञानावर जगातील अनेक विद्यापीठात व्याखानं दिली. हे विचार केवळ माहितीचं भांडार नव्हते. विविध विषयावर अनुभवातून तावून सुलाखून तयार झालेले शुध्द, प्रभावी. सुवर्णजडित हिरे, माणके होती. हे तत्त्वज्ञान जगाची उत्पत्ती, जगातील सर्व पदार्थ, प्राणीपशुपक्षी, मानव, ईश्वर, आत्मा, परमात्मा, ऐहिक सुख व पारमार्थिक मोक्ष प्राप्तीचे मार्ग सांगून मानवीजीवन कसं उन्नत, सफल होईल हे सांगणारे अनुभवसिध्द विचार होते. याचे आकर्षण डॉ. राधाकृष्णन् यांना विद्यार्थीदशेतच निर्माण झालं. त्यासाठी त्यांनी अनेक जुने-नवे ग्रंथ, अनेक तत्वज्ञांची चरित्रं व विचार याचं परिशीलन केलं. अनेक महापुरुषांची संगत जोडून त्यांचे विचार ऐकले. कथा, कीर्तनं, व्याख्याने ऐकली. आपल्या जीवनक्रमातील सुखदुःखाच्या अनुभवातून त्यांना या विचारांचा आलेला पडताळा पाहिला. त्यावर स्वतःच विचार करून त्यातले चांगले. बुध्दीला पटणारे विचार त्यांनी आत्मसात केले. त्यातील दोष व फापटपसारा यांचा विचारपूर्वक त्याग केला. केवळ ग्रंथातील माहितीवर विश्वास, अंधश्रध्दा नाही ठेवली. आपल्या दिव्य विचारकसोटीवर त्यांना पारखून त्यांचा निवडक संग्रह केला आणि हे विचारधन फार मोठ्या प्रमाणात जमवलं, आत्मसात केलं. मग त्यांनी त्याचं वितरण केलं. अनेक विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना अनेक तत्त्वज्ञान्यांना ते आपल्या अमोघ, रसाळ वाणीतून पटवून दिले. त्या धनाचा केवळ साठा करून ठेवला नाही. त्याचा दुरूपयोगही नाही केला म्हणजे ते सांगून पैसा, सत्ता, प्रतिष्ठा नाही मिळवली. तर लोकांचे जीवन खऱ्या अर्थाने सुखी व्हावे म्हणून जगभर त्यांचा प्रसार केला. मग त्यांना भारतात केवळ उत्तम प्राध्यापक, महान तत्त्वज्ञानी म्हणूनच गौरव नाही प्राप्त झाला. तर त्यांना प्रथम आपल्या राष्ट्राचे परदेशातील वकील नंतर उपराष्ट्रपतिपद व अखेर राष्ट्रपतीपद देऊन त्यांना 'भारतरत्न' म्हणून गौरवले. त्यामुळे भारताची प्रतिमा व प्रतिष्ठा सर्व जगात शिखराला जाऊन पोहोचली.


दिनविशेष:

 ना. ग. गोरे जन्मदिन - १९०७ : नानासाहेब गोरे एक थोर स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी कार्यकर्ते, लेखक, वक्ते आणि विचारवंत होते. विधवेशी विवाह करून समाजाला आदर्श घालून देणारे ते कर्ते सुधारक होते. नानासाहेबांचा जन्म रत्नागिरीतील हिंदळे या गावी झाला. बी.ए. एलएल. बी. पर्यंत शिक्षण पुणे येथे पुरे केले. पुण्यातील पर्वती मंदिर अस्पृश्यता निवारण सत्याग्रहापासून समाजकार्यास सुरुवात केली. काँग्रेस समाजवादी पक्षाच्या संस्थापकांपैकी ते एक होते. १९६४ मध्ये प्रजासमाजवादी पक्षाचे अध्यक्ष झाले. १९६७-६८ मध्ये पुण्याचे महापौरपदही त्यांनी भूषविले. १९५५ मध्ये झालेल्या गोवा विमोचन चळवळीत त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. १ मे १९९३ रोजी त्यांचे पुणे येथे हृदयविकाराने निधन झाले. नानासाहेबांनी विपुल लेखनही केले आहे. 'समाजवादाचा ओनामा' हे त्यांचे पहिले पुस्तक, कारागृहाच्या भिंती', 'डाली', 'शंख आणि शिंपले', 'सीतेचे पोहे', 'गुलबक्षी', 'आव्हान आणि आवाहन', 'ऐरणीवरील प्रश्न' ही त्यांची गाजलेली पुस्तके, कालिदासाच्या मेघदूताचा समछंद अनुवाद, नेहरूंच्या आत्मचरित्राचा | अनुवाद प्रसिध्द आहेत. बेडूकवाडी, चिमूताई घर बांधतात ही पुस्तके बालकांसाठी लिहिली. ते उत्तम वक्ते होते. रेखीव मांडणी, स्पष्ट विचार आणि अभ्यासपूर्ण विवेचन ही त्यांच्या वैचारिक लेखनाची आणि भाषणांची वैशिष्ट्ये होती.


सामान्यज्ञान:

 उंट हा पाण्यावाचून २ आठवडे राहू शकतो. • उंटाला वाळवंटातील जहाज म्हणतात. • उंट एकाच वेळेस २५ गॅलन पाणी पिऊ शकतो.




No comments:

Post a Comment