दैनिक परिपाठ
चिंतन :
दुसऱ्यास सुखाची फुले दिली तरच सुखाचे अत्तर आपणास मिळेल.
- आपण जेव्हा दुसऱ्याला सुखी करतो तेव्हा त्याला सुखी झालेले पाहून आपल्या मनालाही एक प्रकारचे दिव्य सुख मिळते. अशा रीतीने विचार करून जर प्रत्येक व्यक्ती वागू लागली, दुसऱ्यांच्या सुखासाठी धडपड करू लागली तर जगातील द्वेष, ईर्षा, हेवा-दावा ह्या साऱ्या हीन भावना नष्ट होतील आणि जिकडे तिकडे मांगल्याचे, स्नेहाचे वातावरण पसरेल. हे जाणून घेऊन प्रत्येकाने वागण्याचा प्रयत्न करायला हवा. आपण जे पेरतो तेच उगवते हा मूलमंत्र लक्षात घ्यावा.
श्लोक:
यःपठति लिखति पश्यति, परिपृच्छति पठितानुपाश्रयति तस्य दिवाकरकिरवैः नलिनीदलमिव विकाश्यते बुध्दिः ।।
-जो वाचन करतो, लिहितो, पाहतो (निरीक्षण करतो) प्रश्न विचारतो, विद्वानाच्या सहवासात राहतो. त्याची बुध्दी, सूर्याच्या किरणांनी कमळ फुलावे त्याप्रमाणे विकसित होते.
प्रार्थना:
सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना । तिमिरातूनी तेजाकडे प्रभू, आमुच्या ने जीवना ||धृ०॥ सुमनात तू, गगनात तू, ताऱ्यांमध्ये फुलतोस तू, सद्धर्म जे जगतामध्ये, सर्वांत त्या वसतोस तू, चोहीकडे रूपे तुझी, जाणीव ही माझ्या मना तिमिरातूनी ॥१॥
श्रमतोस तू शेतांमध्ये, तू राबसी
श्रमिकांसवे, जे रंजले वा गांजले, पुसतोस त्यांची आसवे, स्वार्थाविना सेवा जिथे, तिथे तुझे पद पावना तिमिरातूनी ॥२॥
न्यायार्थ जे लढती रणी, तलवार तू त्यांच्या करी, ध्येयार्थ जे तमि चालती, तू दीप त्यांच्या अंतरी, ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्यांची साधना तिमिरातूनी ॥३॥
करुणाकरा करुणा तुझी, असता मला भय कोठले ? मार्गावरी पुढती सदा, पाहीन मी तव पाऊले । सृनत्व या हृदयामध्ये, नित जागवी भीति विना ॥४॥ - कुसुमाग्रज
कथाकथन:
‘जयंत विष्णु नारळीकर : (आध्यात्मिक दृष्टीकोन असलेला भारतीय वैज्ञानिक) पाश्चात्य संशोधकांनी जे शोध लावले त्यामागे व्यापार, यंत्रे, तंत्रज्ञान हाच पाया होता. त्यांचा युद्धसंभार, वसाहतवाद वाढविणे व भांडवलशाही समाजरचनेचा विकास प्रामुख्याने आढळतो. परंतु भारतीय संस्कृतीतील विश्वबंधुत्व, सत्य, अहिंसा आदि जीवनमूल्यांचा 'सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः' अशा 'मंगल भवतु सब्ब मंगलम्' या विश्वकल्याणकारी भावनेचा अभावानेच साक्षात्कार होतो. श्री. जयंत विष्णु नारळीकर हे आजचे विश्वमान्य संशोधक याच ध्येयवादाने प्रेरित झालेले विख्यात शास्त्रज्ञ आहेत. त्यांचे वडिल विष्णु वासुदेव नारळीकर हे रँग्लर होते. त्यांची आई श्री. कृष्णाजीपंत हुजुरबाजार यांची कन्या - संस्कृत विदुषी आहेत. अशा सुविद्य दांपत्याच्या पोटी ३१ जुलै १९३७ साली श्री. जयंतरावांचा जन्म झाला. जात्याच हुषार आणि सुसंस्कृत, बुध्दिमान, बनारस युनिव्हर्सिटीतून ते १९५८ साली. डी.एस.सी. झाले व त्या नंतर १९६० साली केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी बी. एस. एम. ए., पीएच. डी. असे उच्च शिक्षण घेतले. खगोलशास्त्रातील मानाचे टायसन पारितोषिक त्यांना मिळाले. १९५९ साली गणितशास्त्रात रँग्लर झाले. १९६२ साली स्मिथ्स पारितोषिकाचे मानकरी ठरले. विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी हॉईल, बॉडी व बार्निज या | शास्त्रज्ञांसमवेत स्थिरस्थिती विश्वाचा सिध्दांत त्यांनी मांडला. जयंतरावांनी त्याला गणिताचा आधार देऊन तो सिध्दांत सिध्द केला. विश्व स्थिर असले तरी ते आकुंचन प्रसरण पावते; पण एकंदरीने ते विकसनशील आहे, प्रसरण पावत आहे, हा सिध्दांत त्यांनी मांडला. श्री. नारळीकर यांच्या मते, विज्ञानाचा मनाशी, बुध्दीशी संबंध आहे. विज्ञानातील अनेक सिध्दांत सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी अनेक कथा कादंबऱ्या लिहिल्या व विज्ञान | - लोकप्रिय केले. भारतातील खगोलशास्त्रज्ञांसाठी त्यांनी 'इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स' या संस्थेची उभारणी केली. अनेक पुरस्कार मिळवूनही नम्रJ
सौजन्यशील, उदंड कीर्ती व लोकप्रियता लाभलेला हा भारतीय संशोधक अजूनही कार्यरत आहे.
सुविचार:
जीवन किती वर्ष जगलात याला महत्व नाही, जीवन कसे जगलात याला महत्व आहे- रणजित देसाई
दिनविशेष:
लँडस्टेनर कार्ल जन्मदिन १८६८ : कार्ल लँडस्टेनर हा ऑस्ट्रियन शरीरशास्त्रज्ञ. व्हिएन्ना येथे याचा जन्म, शिक्षण होऊन तेथील विद्यापीठातच तो शरीरशास्त्राचा प्राध्यापक होता. मानवी रक्ता संबंधी याने महत्त्वाचे संशोधन केले आहे. झिबर्ग, झुरिच, म्युनिक या विविध ठिकाणी त्याने संशोधन केले. १९०० मध्ये याने मानवी रक्ताचे प्रकार, त्यांचे एकमेकांशी साम्य याचे संशोधन प्रसिध्द केले. नंतर त्याला याबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले. परंतु त्याच्या शोधाचे महत्व लोकांच्या लक्षात यायला बराच काळ लागला. रक्तातील संलग्नतेच्या गुणधर्मावरून याने रक्ताचे चार प्रकार मानले आहेत. याच्या प्रयोगातून रक्तसंक्रमणाचे तत्व सिध्द होऊन लाखो लोकांचे प्राण वाचले. पुढे अमेरिकेमध्ये रॉकफेलर इन्स्टिट्युटच्या वैद्यकीय विभागात याने काम केले. 'दि स्पेसिफिसिटी ऑफ सिरॉलॉजिकल रिअॅक्शन' हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे.
सामान्य ज्ञान:
रक्तपेढी- रुग्णालयाच्या खास विभागात रक्तदात्याकडून गोळा केलेले रक्त त्यावर योग्य प्रक्रिया करून विशिष्ट रीतीने साठविले जाते आणि आवश्यक तेव्हा रुग्णाकरिता पुरविले जाते, त्याला रक्तपेढी म्हणतात.
No comments:
Post a Comment