Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Wednesday 17 March 2021

शिक्षण आणि संस्कार

                शिक्षण आणि संस्कार 



         माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, शिक्षण आणि संस्कार दोन्हीही मानवी जीवनातील अत्यावश्यक गोष्टी आहेत. संस्कार जीवनाची पायाभरणी मजबूत करतात व शिक्षणामुळे मानवी जीवनाची उत्तुंग इमारत उभी राहणे शक्य होते. जीवनाची गाडी सार्थकतेच्या दिशेने जायची असेल तर तिला शिक्षण आणि संस्कार या दोन्ही चाकाची गरज आहे. 

          शिक्षण या शब्दाच्या व्यापक अर्थाकडे पाहून विचार केला तर शिक्षणातून संस्कार होतात असा आभास होतो व संस्कारातूनही शिक्षण होत असल्याची जाणीव होते. “शिलाशिवाय विद्या फुकाची आहे!" या एकाच वाक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण व संस्कार या दोन गोष्टीतील अद्वितीय संबंध स्पष्ट केला आहे. जिजाऊने शिवबाला रामायण व महाभारतातले धडे शिकवले व न्याय नीतीच्या शिक्षणाबरोबरच स्वदेश प्रेमाचा संस्कार केला. कर्मवीरांनी अनेक मुलांना शिक्षण दिले परंतु शिक्षणाबरोबरच "स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद" असा श्रमप्रतिष्ठेचा संस्कारही दिला. 

           फुले दांपत्याने शिक्षणाबरोबरच समाजाला समानतेचा संस्कार दिला. शाहूंनी शिक्षणासोबतच कला-संस्कृतीचा वसा कोल्हापूरच्या मातीला बहाल केला. अशा प्रकारे संस्कार हे शिक्षणाबरोबरच जगण्यातूनही परावर्तीत होत असतात. 

         आई ही मुलाची पहिली गुरू असते व तीच संस्कारांची गाथा असते. मुलाच्या इवल्याशा हाताला धरून त्याला चालायला शिकवणाऱ्या मातेने आपल्या मुलाला जीवनाच्या मार्गावरून चालताना उपयोगी पडतील असे संस्कारही दिले पाहिजेत. शालेय शिक्षणातून माणसाच्या जीवनाला आकार यावा अशी सार्थ अपेक्षा आहे आणि म्हणूनच शालेय शिक्षणाच्या क्षणा-क्षणातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार होणे अभिप्रेत आहे. शाळेच्या परिपाठातून सदविचार आणि सदाचाराचा संस्कार होतो. इतिहासाच्या पाना-पानांतून राष्ट्रभक्तीचा संस्कार होतो. भाषाविषयातून अभिव्यक्तीचा आणि गणितातून व्यवहारी वृत्तीचा संस्कार होतो. म्हणूनच शिक्षकाने शिक्षणाच्या प्रवाहाबरोबरच विद्यार्थ्यांना संस्कारांची देण बहाल करावी. शालेय शिक्षणाबरोबरच मानवी जीवनाशी संबंधित समाजातील अनेक गोष्टी मानवी मनावर परिणाम करतात. संस्कारांचा वसा व शिक्षणाचा ठसा उमटलेल्या मनुष्याने कुसंस्कारापासून आपल्या मनाचा कानाकोपरा दूर ठेवावा. उच्चशिक्षित तरुण आज समाजामध्ये विघातक कृत्ये करताना दिसतात. म्हणूनच व्यावहारिक शिक्षणाला संस्काराची जोड देणे आज गरजेचे आहे. तसे झाल्यासच शिक्षणाचा मूळ उद्देश सार्थ ठरेल व मानवी जीवन सफल होईल! 

जय हिंद!

No comments:

Post a Comment