Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Thursday 4 March 2021

प्राथमिक शिक्षणाचे महत्व- निबंध

           प्राथमिक शिक्षणाचे महत्व



        शाळेतील अभ्यासात एखादयाला एखादया विषयात अपयश आले की, अगदी सहजगत्या म्हटले जाते की, त्याचा पायाच कच्चा आहे. पाया ठीक नसेल, भक्कम नसेल तर इमारत कोसळणारच ! तेच महत्त्व आहे प्राथमिक शिक्षणाचे. व्यक्तीला समर्थपणे जीवन जगता यावे, म्हणून तिला लिहिता-वाचता येणे, काही किमान कौशल्ये अवगत असणे आवश्यक असते. जीवन कसेतरी जगण्यात अर्थ नाही, ते आनंदाने जगता यायला हवे त्यासाठी विचारशक्ती, कल्पनाशक्ती, संवेदनशक्ती इत्यादी मानसिक गुणांची वाढ व्हावी लागते. अभिरुची विकसित व्हावी लागते. या सगळ्याचा पाया बालपणातच घालता येतो. बालपणी जे संस्कार होतात, तेच आयुष्यभर टिकतात. म्हणजेच बालपणातील संस्कारांवरच व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व अवलंबून असते. म्हणून प्राथमिक शिक्षण खूप महत्त्वाचे ठरते. 

         प्राचीन काळात बहुतेकांना घरीच शिक्षण दिले जाई. कुटुंबाच्या परंपरागत व्यवसायात मुलाला लहानपणापासूनच गुंतवून त्या त्या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाई. फार थोड़ जणांना लेखन-वाचनाच्या क्षेत्रात प्रवेश मिळे. लेखन-वाचन व शास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी गुरुगृही जाऊन राहावे लागे. तेथे विदयार्थ्याला घरकामापासूनची सर्व कामे करावी लागत. साहजिकच संसारासाठी आवश्यक सर्व कौशल्ये त्याला प्राप्त होत. एक परिपूर्ण नागरिक बनून तो गुरूकडून घरी येई. काळाच्या ओघात ही गुरुकुल पद्धत केव्हाच नष्ट झाली. तरीही बालपणी करायच्या संस्कारांचे महत्त्व कमी झालेले नाही, किंबहुना ते वाढले आहे. सध्याचे जीवन खूप गुंतागुंतीचे बनले. या गुंतागुंतीच्या जीवनाला समर्थपणे सामोरे जाण्यासाठी मुलांची लहानपणीच चांगली जोपासना करणे आवश्यक आहे. आज केवळ आईवडील, केवळ कुटुंब वा एखादी व्यक्ती कोणत्याही विद्यार्थ्याला घडवू शकत नाहीत. त्याला सामुदायिक शिक्षणाचीच आवश्यकता आहे. म्हणून प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व अधिकाधिक वाढत आहे. 

           आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, प्रत्येक व्यक्ती डॉक्टर होऊ शकत नाही; वा इंजिनियर होऊ शकत नाही; वा प्रत्येकजण आय.ए.एस्. अधिकारी होऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीचे स्वत:चे काही विशिष्ट गुण असतात. त्यानुसारच त्या व्यक्तीचा कल निश्चित होतो. त्या गुणांना अनुकूल अशा क्षेत्रातच ती व्यक्ती कर्तबगारी गाजवू शकते. सचिन तेंडुलकरजगद्विख्यात फलंदाज आहे. तेच त्याचे गुण आहेत. त्याला जबरदस्तीने प्राध्यापक व्हायला लावले असते, तर त्याला त्या क्षेत्रात अपयशच आले असते. म्हणून व्यक्तीच्या अंतरंगातील गुणांनाच खूप महत्त्व आहे. ते गुण ओळखावे लागतात. त्यानुसार व्यक्तीला जीवनमार्ग निवडण्यास मार्गदर्शन करावे लागते. प्राथमिक शिक्षणात हेच नेमके करायचे असते. व्यक्तीच्या अंतरंगातील सुप्त गुणांना जागृत करून त्यांना आकार देण्याची गरज असते. प्राथमिक शिक्षण हेच कार्य करत असते.  

           अंधश्रद्धा, धर्मांधता, प्रांताभिमान, जाति-अभिमान या वृत्ती सध्या फोफावत आहेत. या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन माणसाला सन्मानाने वागवणारा, समानतेने वागणारा सुजाण नागरिक आपल्याला घडवायचा आहे, हे महान कार्य प्राथमिक शिक्षणच करू शकते.

No comments:

Post a Comment