Breaking

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास

पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यास
चित्रावर क्लिक करा

Tuesday 23 February 2021

निबंध- वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वृक्ष वाढवा प्रदुषण थांबवा

 


वृक्ष वाढवा प्रदूषण थांबवा/ वृक्षवल्ली आम्हा सोयरे

“वृक्षवल्ली आम्हा सोयिरी वनचरे” तुकाराम,
           पण वृक्षांशी असलेले आमचे हे नाते आम्ही विसरून गेलो आहोत म्हणून प्रदूषणाचा राक्षस आपला अक्राळविक्राळ जबडा फाडून आमच्यापुढे उभा आहे.
               वृक्ष नाहीसे झाले आणि पर्यावरणाचा तोल बिघडला, पाणी प्रदूषित झाले, हवा प्रदूषित झाली. शहरात मोटर्स, स्कूटर्स सतत धावत राहतात. धूळ उडते व धूरही वाहतो, त्यामुळे वातावरण प्रदूषित होते. झाडे असली तर ती बिचारी धूळ झेलून घेतात, धूर अडवतात. पण जैथे झाडे नाही तेथे मात्र शुद्ध हवेचे प्रमाण कमी होत जाते. शहरातील हवेपेक्षा खेड्यातील हवा अधिक शुद्ध असते याचे कारण तरी हेच होय.
        पण खेड्यातही आज काय दिसून येते? राजकारणाप्रमाणे तिथलेही नैसर्गिक वातावरण प्रदूषित झाले आहे. तिथेही मोटरसायकल आहेत, स्कूटर्स आहेत, जवळपास साखरेचे किंवा इतर कारखाने आहेत वातावरणाचे संतुलनच बिघडून गेले आहे. एस. टी. तर गावोगावी, खेडोपाडी आपल्या धुळीचा व कधी-कधी आपल्या धुराचा प्रसाद वाटत फिरत असते.
            प्रदूषण कसे भयानक असते ते भोपाळच्या नागरिकांना विचारा, ते सांगतील. एका पहाटे भोपाळला अचानक एक विषारी वायू कारखान्यातून बाहेर पडला आणि शहरात घुसला – पांडवाच्या शिबिरात अश्वत्थामा शिरला होता तसा. मग त्याने काही लोकांचे सरळसरळ बळी घेतले. जे कोणी अधिक प्रतिकारक्षम व धष्टपुष्ट होते त्यांचे त्याने डोळे काढून घेतले – पूर्वीच्या काळातील राजे अपराध्याला शिक्षा देत असत तसे. आणि काही लोकांचे अवयव बधिर केले. जवळपास जंगल असते तर माणसावर झालेले बरेचसे प्रहार त्याने स्वतःवर झेलले असते. सय्यद बंडाने शिवाजीवर केलेला प्रहार जिवा महालाने वरच्यावर उचलून बंडाचा हात तरवारीसकट उपटून फेकून दिला तसे जेथे मोठे कारखाने आहेत तेथे कारखान्यातील धुरामुळे जवळपासचे वातावरण प्रदुषित होत असते. म्हणूनच कारखान्यात उंच चिमण्या लावण्याची पद्धत आहे. तरीही कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या कामगारांना किंवा पोलाद कारखान्यातील कामगारांना क्षयासारखे रोग होतात आणि त्यांचे आयुष्यमानही कमी होते.
           नर्मदा प्रकल्प वृत्तपत्रातून खूप गाजला. ह्या प्रकल्पामुळे आजूबाजूच्या फार मोठ्या शेतीला भरपूर पाणी मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मत्स्यपालनाचा उद्योग सुरू होऊन अनेकांची पोटे भरणार आहे. प्रत्यक्ष प्रकल्पात काम मिळाल्याने कितीतरी तरुणांची बेकारी संपणार आहे. फार मोठ्या विभागाला वीजपुरवठा होणार आहे. आणि त्यातून कारखानेच नव्हेत तर शेती समृद्ध होणार आहे. या प्रकल्पाने फायदेच फायदे होणार आहे. फक्त तोटा एकच आहे – पर्यावरण बिघडणार आहे. प्रकल्प व्हावा की होऊ नये यावर वाद माजले आहेत कारण इतर सर्व भौतिक सुखे एका बाजूला व प्रदूषणाचा धोका दुसऱ्या बाजूला असे हे पारडे समतोल आहे.
              वातावरणातील प्रदूषण थांबविण्याकरिता कारखान्यात उंच चिमण्यांद्वारे धूर जवळपास पसरणार नाही अशी व्यवस्था होणे आवश्यक आहे. त्यापेक्षाही हा विषारी धूर रासायनिक प्रक्रियेने निर्जीव करून टाकणे हा जास्त चांगला उपाय आहे. पण पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता झाडे लावणे हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. प्रदूषणाच्या बाबतीत शासनाचे लक्ष वेधणे आणि प्रत्यक्ष कार्याचा आढावा घेऊन कार्य पुढे
नेणे ही कामे सामाजिक संस्था चर्चासत्रे, प्रशिक्षण शिबिरे यातून केली तर पर्यावरणाची समस्या सोडवायला मदत होईल.
         ज्या वृक्षाला आज आपण कापतो त्या वृक्षाला ईश्वर समजून पूजा करण्याची आमची परंपरा आहे श्रीकृष्णाने पारिजात स्वर्गातून आणून सत्यभामेला दिला यात ही पूजा दिसून येते ही पूजा कालिदासाने केली आहे वृक्षपूजा हा आदिवासींच्या लोकगीतांचा विषय झाला आहे. वटवृक्षाखाली भगवान बुद्धाला नव्या ज्ञानाचा प्रकाश मिळाला ज्ञानेश्वरांनी पिंपळाच्या झाडाखाली समाधी घेतली वृक्षपूजा म्हणजे परमेश्वर पूजा होय म्हणून जगात सर्व समाजातील लोकांमध्ये वृक्षपूजा आढळून येते जिप्सीही वृक्षपूजा करतात. जर्मन लोकांमध्ये वृक्षपूजेचा उल्लेख आहे.
         आम्ही वृक्षपूजा सोडली आणि वृक्षांचे हनन करीत आलो म्हणून आज पर्यावरणाचा तोल ढळला आहे पावसाचे नियमित येणे बंद झाले, महापुरांचा प्रकोप वाढला, रूक्ष वाळवंट पसरले आणि दुष्काळाचेही मूलभूत कारण हेच आहे.
          जेव्हा देशात चिपको आंदोलन करणारी, वृक्षावर पुत्रवत प्रेम करणारी आणि त्यांच्यासाठी प्राण समर्पण करणारी माणसे होती तेव्हा ती माणसे माणसावरही प्रेम करीत होती आज वृक्षावरच प्रेम नाही तिथे माणसावर कुठून राहणार? ज्या देशात वृक्षासाठी माणसांनी बलिदान दिले त्या देशात झाडाबरोबर माणसेही कापली जात आहेत धर्मभेद, जातीभेद इत्यादींच्या नावाखाली माणुसकीचे शिरकाण होत आहे. अशावेळी संपूर्ण देशभर शांत सुंदर व स्वच्छ हवा पसरण्यासाठी हिरवळीची गरज आहे. म्हणून वृक्षदिंडी काढायला हवी. हिरवे स्वप्न पुलकित करायला हवे न जाणो, युवकांनी लावलेल्या वृक्षातूनच बुद्धाला जन्म देणारा एखादा बोधीवृक्षही निर्माण होईल. ही सर्व आव्हाने विद्यार्थ्यांपुढे उभी आहेत. वृक्षसंवर्धन हेच आजच्या विद्यार्थ्यांचे पहिले राष्ट्रीय कार्य होय

No comments:

Post a Comment